सुप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचं निधन
पुणे, ता 11 जून (प्रतिनिधी) :- सुप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांच्या निधनाची बातमी नुकतीच समोर आली असून वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात अल्पशाः आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले. रवी परांजपे यांची भारतीय शैलीतील चित्रकार म्हणून खास ओळख आहे. त्यांनी वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात यांसारख्या क्षेत्रात आपल्या कलाकृतीचा ठसा उमटवलेला आहे.
चित्रकार रवी परांजपे यांनी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमध्ये संशोधनपर लेखन सुद्धा केले. ‘ब्रश मायलेज’ हे त्यांचे आत्मकथन आणि परदेशी चित्रकारांची ओळख करून देणारे ‘शिखरे रंगरेषांची’ आणि ‘नीलधवल ध्वजाखाली’ हे लेखसंग्रह प्रकाशित झाले आहे.
चित्रकार रवी परांजपे यांना ‘कम्युनिकेशन आर्ट्स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कारही प्राप्त झाला होता. तसेच त्यांना दयावती प्रतिष्ठानचा पुरस्कार ही मिळाला होता. त्यांना ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कार प्राप्त झाला होता. याशिवाय त्यांच्या ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.