ठाणे स्मार्ट सिटीचा ७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
ठाणे (ता २७ जून, संतोष पडवळ ) : ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी लि.मार्फत स्मार्ट सिटी अभियानाचा ७ वा वर्धापन दिन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महानगरपालिका मुख्यालयाच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात ठाणे स्मार्ट सिटी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्य तांत्रिक अधिकारी प्रविण पापळकर,नोडल आँफिसर विकास ढोले, कार्यकारी अभियंता महेश अमृतकर यांच्यासह दत्ता मेघे अभियांत्रिकी काँलेज आणि तेरणा अभियांत्रिकी काँलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दि २५ जून २०१५ रोजी देशात १०० शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना राबविण्याबाबतीत घोषित केले. त्या प्रमाणे एकुण ४ टप्प्यात विविध राज्यातील एकूण १०० शहरांची निवड करण्यात आली. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ठाणे शहराची निवड करण्यात आली आणि केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि राज्य शासनाचे शासन निर्णयानुसार ठाणे महानगरपालिका अंतर्गत केंद्र शासन, राज्य शासन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे स्मार्ट सिटी लि या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.या अंतर्गत शहरात विविध प्रकल्प राबविण्यात आले आहेत.
दिनांक २५ जुन२०२२ रोजी या स्मार्ट सिटी अभियानास ७ वर्षे पूर्ण झाली असून केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार ठाणे स्मार्ट सिटी लि मार्फत स्मार्ट सिटी अभियानाचा ७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यामध्ये विविध उपक्रम राबवून स्मार्ट सिटी अभियानाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दत्ता मेघे अभियांत्रिकी काँलेजच्या काँप्युटर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना निळकंठ येथील परिवहन सेवा केंद्रातून चालविण्यात येणाऱ्या इंन्टेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टीम या प्रकल्पाची माहिती संबंधित प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुख यांनी दिली. ठाणे रेल्वे स्टेशन पुर्व येथे राबविण्यात येणाऱ्या मल्टीमोडल मोडल ट्रान्झिट हब, गावदेवी मैदानात उभारण्यात आलेल्या भुमिगत पार्किंग प्रकल्प तसेच मासूंदा तलावाजवळ उभारण्यात आलेल्या ग्लास कँन्टीलिव्हर फुटपाथ या प्रकल्पाची माहिती या प्रकल्पाची माहिती देखील दत्ता मेघे अभियांत्रिकी काँलेज आणि तेरणा अभियांत्रिकी काँलेजच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली.
त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना हाजुरी येथे उभारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँन्ड कंन्ट्रोल सेंटर या प्रकल्पाचे परीचलन व उपयोगिता याबाबतची माहिती देण्यात आली.
तसेच दत्ता मेघे अभियांत्रिकी काँलेजच्या काँप्युटर अभियांत्रिकी आणि मेकेनिकलअभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नळ संयोजनावर बसविण्यात आलेल्या स्मार्ट वाँटर मिटर बाबतीत प्रेझेन्टेशन आणि लाईव्ह डेमो संबंधित प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुखांनी दिली.
दरम्यान नागला बंदर खाडीकिनारा सुशोभीकरण प्रकल्पाच्या जागी कार्यकारी अभियंता तथा नोडल आँफिसर विकास ढोले, कार्यकारी अभियंता महेश अमृतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दत्ता मेघे अभियांत्रिकी काँलेज आणि तेरणा अभियांत्रिकी काँलेज च्या विद्यार्थ्यांना सदर प्रकल्पाचे बाबतीत माहिती करून देण्यात आली. या सर्व उपक्रमास विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.