मुंबईतील कुर्ला विभागात 2 चार मजली इमारती कोसळून 2 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी
मुंबई, ता 28 जून (संतोष पडवळ) मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर सोसायटी येथील जिल्हाधिकारी यांच्या जागेवरील ४० – ५० वर्षे जुन्या धोकादायक इमारतींपैकी २ चार मजली इमारती सोमवारी रात्री ११.४० वाजताच्या सुमारास अचानक कोसळल्या. या दोन पैकी एक इमारत पूर्णपणे कोसळली तर दुसऱ्या इमारतीचे दोन मजले कोसळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत 2 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी आहेत. मात्र इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. १० जखमींपैकी ९ जखमींवर नजीकच्या राजावाडी रुग्णालयात व एका जखमीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची नुकसान भरपाई देण्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. तसेच, इमारत दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.