ठाण्यात एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी ; प्रभावी अंमलबजावणीचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
ठाणे (ता १ जुलै, संतोष पडवळ ): केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठाणे शहरात एकल वापराच्या प्लास्टिकवरील बंदीबाबत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण विभागाचे कर्मचारी, सर्व स्वच्छता निरीक्षकांनी प्रत्येक प्रभाग समितीत प्लास्टिकबंदीची कारवाई काटेकोरपणे करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांनी दिले.
आज महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्लास्टिक बंदी संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त(२) श्री. हेरवाडे यांनी शासनाच्या एकल वापराच्या प्लास्टिक बंदी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देतानाच प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ नुसार एकल वापराच्या ( सिंगल युज ) प्लास्टिक वस्तू वापरण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.
सजावाटीसाठी प्लास्टिक, पॉलिस्टीरिन (थर्माकोल) मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड आणि सिगारेटची पाकिटे यांची प्लास्टिक आवरणे, प्लास्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काडया, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांडया आईस्क्रीम कांड्या प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकु, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या ( स्टिरर्स ), १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यावर बंदी घालण्यात आली आहे.
याबरोबरच, महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८ अंतर्गत काही गोष्टी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. यामध्ये कंपोस्टेबल प्लास्टिक ( कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून) सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या ( कॅरी बॅग्स, नॉन वोवन बॅग्स सह ) हॅण्डल असलेल्या व नसलेल्या बॅग, डिश , बाउल, कन्टेनर ( डबे ) आदी वर बंदी घालण्यात आली आहे.
१ जुलै पासून संपूर्ण देशात सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी असून वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसुचनेनुसार प्लास्टिक वापरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकरिता दंडाची रक्कम रुपये ५०० आकारण्यात येणार आहे. तर दुकानदार, फळे व भाजी विक्रेते, व्यापाऱ्यांकरिता प्रथम गुन्हा केल्यास ५,०००, द्वितीय गुन्हा केल्यास १०,००० तर तृतीय गुन्हा केल्यास २५,००० व ३ महिने कारावासाची शिक्षेची तरदूत करण्यात आली आहे.
दरम्यान महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फ़त देखील उपआयुक्त अनघा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गटप्रमुख, गटाधिकारी यांची आढावा बैठक घेऊन शालेयस्तरावर प्लास्टिकबंदी बाबत विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
..