ठाण्यात मुसळधार पावसाने दरड कोसळली तर खड्याने घेतला तरुणाचा बळी
ठाणे, ता 4 जुलै (संतोष पडवळ) : ठाण्यातील मुंब्रा बायपास जवळील टोल नाका पुढे दरड कोसळल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली.
अधिक माहितीनुसार, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. या दुर्घटनेती माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली.
दरड कोसळल्याने ती हटवण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. दरड कोसळल्याने वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
दरम्यान ठाण्यात खड्ड्याचा पहिला बळी गेला आहे घोडबंदर रोडवर दुचाकीवरून ठाण्याकडून मुंबईकडे जात असताना खड्ड्यामध्ये दुचाकी गेल्याने तोल जाऊन सूफियान शेख हा दुचाकीस्वार दुचाकीवरून रोडवरती पडला. याचदरम्यान पाठीमागूनऱ्या एसटी बसच्या मागील चाकाखाली येऊन त्याचा जागी मृत्यू झाला. ही घटना घोडबंदर रोडवरील काजूपाडा येथील रस्त्यावर मंगळवारी सकाळ घडली. ही घटना ताजी असताना, त्याच ठिकाणी मंगळवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे तोल जाऊन अपघातात झाला. मात्र तो दुचाकीस्वार बचावला आहे. अशी माहिती काशीमीरा वाहतुक पोलिसांनी दिल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.