गायिका सौ. रेखा निकुंभ यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार
डोंबिवली – ८ जुलै ( दीपक जाधव ) गेली पंचवीस वर्ष गायन तथा समाजसेवेच्या माध्यमातून शुक्रता-या सारख्या लकाकणा-या नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका सौ. रेखा निकुंभ यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार दिला गेला. सेवक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल शर्मा आणि हिरकणी पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते हिरकणी पुरस्कार दिला गेल्याने सौ. रेखा निकुंभ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा ३ जुलै रविवार रोजी जळगावच्या बबन भाऊ बाहेती महाविद्यालयात संपन्न झाला.
रेखा निकुंभ यांनी गायनातले जवळपास सर्वच प्रकार हाताळलेले आहेत. त्यांनी सिनेमा आणि लघुपटांसाठी सुद्धा पार्श्वगायन केलेले आहे. त्या स्टेजवरही सतत लाईव्ह शो करीत असतात. विविध कार्यक्रमांत त्यांना परीक्षक म्हणून ही बोलवतात. समाज सेवेची प्रचंड आवड असलेल्या रेखा निकुंभ या गाणं आपला श्वास आहे असं अभिमानाने सांगतात. त्यांना आतापर्यंत अखिल भारतीय पत्रकार संघाचा स्वयंसिद्धा पुरस्कार, साप्ताहिक शब्द खड्गचा स्वरांजली पुरस्कार, पाणी फाऊंडेशनचा अष्टरागीणी पुरस्कार व इतर अनेक छोटे मोठे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. गिनिज रेकाॕर्ड साठीच्या प्रोजेक्ट मधेही त्यांनी एक छोटसं गाणं गायलेलं आहे.
आपल्या प्रतिनिधीशी बोलताना रेखाजी म्हटल्या की महिलांना जास्तीत जास्त पुरस्कार भेटल्याने त्यांचा उत्साह वाढतो व घरातूनही त्यांना पाठिंबा मिळतो. प्रामाणिक मेहनत कधीच वाया जात नाही. हिरकणी पुरस्कार भेटल्याने आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. आगामी काळात लेखक – दिग्दर्शक प्रा. दीपक जाधव यांच्या सोबत माझे अनेक प्रोजेक्ट येत आहेत. पुरस्काराने माझा उत्साह प्रचंड वाढला आहेच. पण जबाबदारीही वाढल्याने मी आणखी मेहनत करणार आहे. या प्रसंगी रेखाजीं चे वडील मारोतराव सुरवाडकर यांनी माझ्या मुलीला हिरकणी पुरस्कार भेटल्याने मी धन्य झालो अशा भावना व्यक्त केल्या तर त्यांचे बंधू प्रा. डाॕ. प्रदीप सुरवाडकर, बहीण संगीता खैरनार आणि आई सुशिला सुरवाडकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. रेखा निकुंभ यांना हिरकणी पुरस्कार प्राप्त झाल्याने संगीत क्षेत्रातून तथा समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..