ठाणे महापालिकेच्यावतीने प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत २९८ किलो प्लास्टिक जप्त तर १ लाख १८ हजार रुपये दंड वसूल

ठाणे (ता 8 जुलै, संतोष पडवळ ): प्लास्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. दिनांक १ जुलै ते ८ जुलै, २०२२ या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये सुमारे २९८ किलो प्लास्टिक जप्त करून सुमारे १ लाख १८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र अविघटनशील कचरा ( नियंत्रण ) कायदा २००६ अंतर्गत महाराष्ट्र शासनद्वारे प्लास्टीक व थर्माकोल इत्यादीपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूंच्या ( उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी साठवणुक ) वर बंदी घालण्यात आली आहे. तथापि ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदर बंदी मोडून प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर गेले काही दिवस अकस्मात धडक कारवाई करण्यात येत आहे.
सदर मोहिमेतंर्गत महानगरपालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लास्टीक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण २९८ किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून १ लाख १८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त मनीष जोशी व आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेच्या ९ प्रभाग समितीमधील स्वच्छता निरीक्षक तसेच विभागातील कर्मचारी आदींनी केली.