जागृती मंच, मुंबई यांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम
मुंबई, ता 11 जुलै (संतोष पडवळ) : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला वृत्तपत्र आणि या वृत्तपत्राचा मूलभूत पाया म्हणजे वृत्तपत्र विक्रेता. जागृती मंचाच्या वतीने पांडुरंगाचे स्मरण करत आषाढी एकादशीच्या निमित्ताने पिढ्यानपिढ्या समाजाची सेवा करण्याचे अलिखित व्रत घेतलेल्या व समाजापासून उपेक्षित असलेल्या गिरणगावातील वृत्तपत्र विक्रेत्यांना पावसापासून संरक्षण व्हावे या एका उद्दात हेतूने रेनकोट वाटप करण्यात आले. वारकरी जसा पांडुरंगाच्या प्रत्यक्ष दर्शनाची अपेक्षा न ठेवता आळंदी ते पंढरपूर असे १८ दिवस ऊन, वारा पाऊस याची तमा न बाळगता पायी वारी करतात. अगदी तसेच खूप मोठा स्वार्थ किंवा आर्थिक अपेक्षा न बाळगता वर्षाचे बारा महिने उन्हाळा पावसाळा व हिवाळा या ऋतूंची पर्वा न करता जग ज्यावेळी साखर झोपेत असते तेव्हा स्वतःची झोपमोड करून वृत्तपत्र विक्रेते बांधव घरोघरी वृत्तपत्र पोहोचवण्यासाठी सज्ज असतात. बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना पावसाचा एकही थेंब न पडलेलं वर्तमानपत्र वेळेत घरी पोहोचविण्याचे काम हे कसे पार पाडत असतील हे एक अप्रूपच आहे. या कर्तव्यदक्ष व कर्तव्यनिष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यासाठीच हा प्रपंच जागृती मंचाने आयोजित केला होता. बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त संजय चौकेकर सन्माननीय प्रकाश गिलबिले वृत्तपत्र विक्रेता संघाची सामाजिक चळवळ तळागाळात पोहोचविणारे जीवन भोसले व शंकर रिंगे या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांना पावसाळी रेनकोट देऊन सन्मानित करण्यात आले. वृत्तपत्र विक्रेता बांधवांशी गेली अनेक वर्षाची असलेली बांधीलकी व ऋणानुबंध हे कायम वृद्धिंगत करण्यासाठी झटणारे जागृती मंचाचे अध्यक्ष राम साळगावकर यांच्या संकल्पनेतून व प्रमुख पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता. याकरिता प्रमुख सहकार्य जीवन भोसले व कृष्णा पाटील यांनी केले.
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ विश्वस्त संजय चौकेकर, प्रकाश गिलबिले, डॉ. प्रागजी वाझा, निरंजन नलावडे, हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून व वृत्तपत्र समुहाचे प्रतिनिधी उपस्थितीत होते. सचिव विष्णू कणेरकर, अनिल पाटकर, एडवोकेट दीपक आजगेकर, चंदू गावडे, ओमकार साळगावकर, अनिल जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव दोरुगडे यांनी केले.