कोकण रेल्वे वाहतूक ठप्प ; चिपळूण जवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली
पनवेल, ता 14 जुलै (प्रतिनिधी) : चिपळूणजवळ दरड कोसळली असून कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. या मार्गावरील अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. तसेच अनेक प्रवासी त्रस्त झाले आहेत.
अंजनी-चिपळूण दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती ही दरड कोसळली आहे. परिणामी कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. सध्या युद्ध पातळीवर दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत खेड रेल्वे स्थानकात तिकीट विक्री थांबवली आहे. परंतु प्रवासी मात्र खोळंबले आहेत. पुढच्या अर्ध्या तासात दरड हटवण्यात येणार असून रेल्वे ट्रॅकवर सुरळीत सुरू होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत पावसाने राज्याला झोडपले आहे. मुंबई आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील पालघर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गडचिरोली जिल्ह्यांना १६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर अनेक जिह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.