भारतीय मजदुर संघाचा मेळावा उत्साहात संपन्न
ठाणे, ता 25 जुलै (दीपक जाधव) : भारतीय मजदुर संघ कामगार क्षेत्रातील अग्रगण्य संघटन आहे आपल्या 67 वर्षाच्या कालखंडात संघटनेने अनेक चढ उतार बघितलेत.राष्ट्र हित आणि उद्योग हिताला प्राधान्य देत कामगार हित प्रामाणिक पणे जोपासण्याचा प्रयत्न भारतीय मजदुर संघांनी केला.परिणामतः राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटनेला मानाचे स्थान प्राप्त झाले.
भारतीय मजदुर संघाला सुरवातीचा काळ अतिशय कष्ट दायक होता.23 जुलै 1955 पूर्वी विस्तपित कामगार संघटनांनी कामगार क्षेत्र व्यापले होते.वर्ष 1920 पासुन ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या प्रभावा खाली कामगार क्षेत्र होते.वर्ष 1947 पर्यंत हीच एकमेव कामगार संघटना होती. कमुनिस्टांच्या प्रभावाखाली संघटना कार्य करीत असल्यामुळे राजकीय उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी त्यावेळी कामगार शक्ती खर्च होत असे. राष्ट्र हिताला दुय्यम स्थान दिल्या जात असे.1947 वर्षी इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस ची स्थापना करण्यात आली.काँग्रेस ची कामगार विंग असा या संघटनेचा परिचय होता,आजही आहे. सरकार आणि मालक केवळ आणि केवळ कामगारांचे शोषण करतात असा समज कामगारांचा करून देण्यात आला त्यामुळे मालक आणि कामगार यात संघर्ष सतत होत राहिला.त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत गेला.त्याचे गंभीर परिणाम कामगारांना भोगावे लागले.
राष्ट्राभिमान कामगारांमध्ये जागृत करणारी कामगार संघटनेची गरज होती.त्या भावनेतूनच दत्तोपंत ठेंगडी नी भारतीय मजदुर संघाची स्थापना 23 जुलै 1955 ला भोपाळ येथे केली.पण संघटना स्थापन करण्याचा निर्णय अचानक झाला नाही.दत्तोपंत कामगार क्षेत्रासाठी नवखे होते.तत्कालीन परम पूजनीय सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोळवरकर (गुरुजी)जी च्या सूचनेवरून दत्तोपंत इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस ( intuc) मधे गेलेत.मध्य प्रदेश इंटक चे 1950-51 मध्ये चे संघटन मंत्री होते.कामगार क्षेत्राचे प्रारंभिक धडे इंटक मध्ये गिर्विल्यानंतर भारतीय मजदुर संघाची स्थापना करण्यात आली.
भारतीय मजदुर संघाचा पाया मजबूत करण्यासाठी दत्तोपंत तब्बल 12 वर्षे परिश्रम करीत राहिलेत.प्रारंभीचे 12 वर्ष भारतीय मजदुर संघाची केंद्रीय कार्य समिती अस्तित्वात नव्हती.कार्यकर्ते जोडणे,कामगार संघटना गठीत करणे आणि कामगारांचा विश्वास प्राप्त करणे यावर त्यावेळी अधिक भर देण्यात आला.दिनांक 13,14 ऑगस्ट 1967 ला दिल्ली येथे भारतीय मजदुर संघाचे प्रथम अधिवेशन झाले.18 प्रांतातून 1352 प्रतिनिधी अधिवेशनात उपस्थित होते.या अधिवेशनाच्या वेळी 541 संघटना भा. म.संघाशी संलग्नित होत्या व त्यांची एकूण सदस्य संख्या होती 2,46,9O2. दादासाहेब कांबळे प्रथम अध्यक्ष तर दत्तोपंत प्रथम महामंत्री झालेत.त्यावेळी भारतीय मजदुर संघाचे कार्यालय मुंबईला होते .
भारताचे वैभव,गौरव,इतिहास तसेच भारतीय संस्कृतीच्या आधारावर भारतीय मजदुर संघाची स्थापना झाली.च्याहे जो मजबूरी हो,हमारी मांगे पुरी करो,याला छेद देत देश के लिये करेंगे काम, कामके के लेंगे पुरे दाम आणि भारत माता की जय या घोषणांना कामगार वर्गाने मान्यता दिली.ज्या ज्या वेळी देशावर संकट आले त्या त्या वेळी भारतीय मजदुर संघाने आंदोलने बाजूला ठेवून आपली नैतिक जबाबदारी समजून भारतीय सैन्याला व तत्कालीन केंद्रीय सरकारला आवश्यक ती सर्व मदत केली.1962 ला चीनने केलेल्या आक्रमणाच्या वेळी,देशातील आणीबाणीच्या वेळी आणि
कारगिल युद्धाच्या वेळी भा. म.संघाने सरकारला मदत केली आहे.
भारतीय मजदुर संघाने कार्ल मार्क्स तसेच त्यांच्या साम्यवादी अनुयायांच्या वर्ग संकल्पनेला बाजूला सारून भांडवल आणि श्रम हे एक दुसऱ्याच्या विरोधात नाही तर ते परस्परपूरक आहेत ही संकल्पना मांडली.श्रमिक ही विकाऊ वस्तू नाही .त्यामुळे भांडवल,श्रमिक आणि श्रम यांचा सारखाच मान राखल्या गेला पाहिजे हे भा. म.संघाचे मत आहे.उद्योगपती कारखाना चालविण्या करीता भांडवल उभे करतो तर कामगार उद्योग चालविण्यासाठी आपले श्रम खर्ची घालतो.त्यामुळे उद्योगपती आणि कामगार त्या उद्योगाचे संयुक्त भागीदार असले पाहिजे तरच कामगारांमध्ये हा उद्योग आपला आहे ही भावना निर्माण होईल आणि वेळ प्रसंगी उद्योगाच्या हितार्थ त्याग करायला मागे पुढे पाहणार नाही.अशीच शिकवण भा. म.संघाच्या सामान्य सदस्यांना देखील दिल्या जात असते.
पूर्वी कामगार आणि मालक असे दोनच पक्ष एकमेकांच्या हिताचा विचार करीत असत.बदलत्या परिस्थितीत आता राष्ट्र हिताचा देखील विचार करावा लागणार आहे.किंबहुना राष्ट्र हिताचा विचार प्रथम करावा लागेल.त्यातच राष्ट्र,उद्योग आणि कामगारांचे हित दडलेले आहे.
भारतीय मजदुर संघाने गत 67 वर्षात कामगार क्षेत्रात जबरदस्त भरारी घेतली आहे.वर्ष 2002 मध्ये केंद्र सरकारने सदस्यता सत्यापण केले.त्यानुसार भारतीय मजदुर संघाची सत्यापित सदस्य संख्या होती 62,15,797.त्यानंतर इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस ची सदस्य संख्या 38,92,011 होती.भा. म.संघाची सदस्य संख्या इंटक पेक्ष्या जवळपास 9 प्रतिषत अधिक होती.त्यानंतर सदस्यता सत्यापण झाले नाही तथापि भा. म.संघाने वर्ष 2011 मध्ये 1 कोटी 87 लाख सदस्य संख्या असल्याचे घोषित केले आहे.
भारतीय मजदुर संघाच्या चिंतन प्रक्रियेमध्ये या राष्ट्राला परम वैभव प्राप्त करून देणे हे अंतिम लक्ष्य आहे.या स्वतंत्र व लोकशाही देशात हिंसा व तोडफोड यास स्थान नाही.भा. म.संघाने वर्गसंघर्षाला मान्यता दिली नाही.राष्ट्राचे औद्योगीकरण,उद्योगाचे श्रमिकिकरण आणि श्रमिकांचे राष्ट्रीय करण यावर जोर देत भा. म.संघाची यशस्वी वाटचाल चालू आहे.भा. म.संघाचे अंतिम लक्ष्य व उद्देश स्पष्ट आहेत.
संपूर्ण रोजगार तसेच अधिक उत्पादनं हेतू श्रमशक्ती तसेच उपलब्ध साधनांचा पूर्ण उपयोग करणे,केवळ नफा तोट्याचा विचार न करता सेवावृत्ती ला स्थान प्राप्त करून देणे,राष्ट्राचे अधिकाधिक औद्योगीकरण करून प्रत्येक व्यक्तीचा योग्य उदरनिर्वाह होईल अशी व्यवस्था करणे.
भारतीय मजदुर संघ केवळ ब्रेड बटर ची पूर्तता करण्यासाठी निर्माण झाली नाही तर भारतीय विचार,हिंदू विचार अर्थात आपल्या पूर्वजांनी संघटने बाबत जे सिद्धांत ,परंपरा सांगितल्या आहेत त्या जोपासण्यासाठी तसेच राष्ट्रवाद,राष्ट्र आणि राष्ट्रीयता या त्रिसुत्रीच्या आधारावर झाली आहे.
भारतीय मजदुर संघ गैर राजनैतिक संघटन आहे.उद्योग आणि कामगारांचे हित जोपासणारा,समविचारी राजकीय पक्ष भा. म.संघाचा सहयोगी राहिला आहे.भारतीय मजदुर संघाची श्रम निती,वेतन नीति,मूल्य निती,उत्पादन मूल्य निती,तंत्रज्ञान निती स्पष्ट आहे.त्यात वैचारिक गोंधळ नाही.
जागतिक स्तरावर कामगार समस्यांवर विचार करण्यासाठी जिनेव्हा येथे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेची स्थापना 1919 वर्षी झाली.त्यात भा. म.संघ समस्त भारतीय श्रमिकांचे प्रतिनिधित्व करीत असत.या वर्षी भा. म.संघाचे पाच प्रतिनिधी आय.ऑल.ओ. च्या बैठकी साठी जीनेव्हा ला गेले होते.
भारतीय मजदुर संघाचे 29 प्रांतात आणि 29 प्रांतातील सर्व उद्योगामध्ये काम आहे.43 महासंघ असून सर्व उद्योगांचे प्रतिनिधित्व त्या माध्यमातून होत असत.
भारतात वरिष्ठ नागरिकांची संख्या जवळपास 16 कोटी आहे.त्यांच्या अगणित समस्या आहेत.वरिष्ठ नागरिकांना एकत्रित करून त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी भा. म.संघाने वरिष्ठ नागरिक परिसंघाची स्थापना केली आहे.थोडक्यात सर्वच स्तरावर भा. म संघ आघाडीवर असून संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांचे आशास्थान आहे.भारतीय मजदुर संघाला भविष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण,डिफेन्स सारख्या संवेदनशील उद्योगात विदेशी गुंतवणूक,बँकांचे विलीनीकरण,वाढती बेरोजगारी,कुशल कामगारांची कमतरता,जवळपास सर्वच क्षेत्रात वाढीस लागलेला भ्रष्टाचार,कमीत कमी श्रमात अधीका अधिक नफा मिळविण्याची मानसिकता असे एक ना अनेक विषय भविष्यात हाताळावे लागतील.वेळ प्रसंगी सरकारशी संघर्ष देखील करावा लागेल.कामगारांनी यासाठी निरंतर सावधान राहण्याची गरज आहे.संघटन आणि नेत्रुवाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे लागेल.
केंद्र सरकारने 39 कामगार कायद्याचे रूपांतर 4 कोड्स मध्ये केले आहे.त्यातील काही तरतुदी कामगार हितार्थ आहेत तर काही उद्योगपतींना पूर्ण संरक्षण देणाऱ्या आहेत.उदाहरणार्थ ज्या कारखान्यात 100 व त्यापेक्षा अधिक कामगार कार्यरत असतील आणि काही कारणास्तव तो कारखाना बंद करावयाचा असेल तर केंद्र सरकारची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य होते.नवीन कोड मध्ये ही संख्या 300 केली आहे.याचा अर्थ असा की 300 पर्यंत कामगार असलेले कारखाने उद्योगपती आपल्या मर्जीने आणि सोयीनुसार केंव्हाही बंद करू शकतील.सरकारच्या अनुमती ची गरज भासणार नाही.त्यामुळे कामगारांत असंतोष पसरू शकतो. भारतीय मजदुर संघाने या बाबत केंद्र सरकारला विचारणा केली आहे.
EPS 95 योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळत असलेले निवृत्ती वेतन रुपये 1000 प्रती माह वाढवून मिळावे या करीता गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष सुरू आहे.निवृत्ती वेतनात आर्थिक विषमता फार मोठी आहे.जवळपास 70 लाख ज्येष्ठ नागरिक या मुळे त्रस्त आहेत.पारिवारिक समस्या वाढीस लागल्या आहेत.निवृत्ती वेतन वाढविणे ही केंद्र सरकारची जवाबदारी आहे.भा. म.संघ याचा सतत पाठपुरावा करीत आहे.70 लाख ज्येष्ठ नागरिकांच्या सहनशक्तीचा केंद्र सरकारने अंत बघू नये ही अपेक्षा.
दत्तोपंत आज आमच्यात नसले तरी त्यांचे विचारधन त्यांनी लिहिलेल्या 104 पुस्तकातून आम्हाला सतत मार्गदर्शन करीत असत.
सोबतच मातृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय मजदुर संघाचे व त्यात कार्यरत करोडो सदस्यांचे प्रेरणास्थान आहे.
भा. म.संघाच्या अडीअडचणीच्या वेळी याच मातृ संघटनेने आधार दिला आणि प्रतिकूल परिस्थितीत देखील मार्गक्रमण करण्यासाठी कार्यकर्त्यात आत्मविश्वास निर्माण केला.
भामसंघाच्या स्थापना दिनानिमित्त समस्त कामगार वर्गाला शुभेच्छा.
भा. म.संघ चिरायू होवो.
वसंत पिंपळापुरे.
_______________________