विसर्जन घाट व कृत्रिम तलावांची ठाणे महापालिका आयुक्तांनी केली पाहणी
ठाणे (ता 27 जुलै, संतोष पडवळ ): सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. प्रत्येक विसर्जन घाटावरील अत्यावश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश देतानाच यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
आज सकाळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी उपवन तलाव विसर्जन घाट येथून कृत्रिम तलावांची व विसर्जन घाटांची पाहणी करण्यास सुरुवात केली. यावेळी माजी महापौर नरेश गणपत म्हस्के, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता जाधव, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त जी.जी.गोदेपुरे, उप आयुक्त शंकर पाटोळे, उप आयुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, अजय एडके, प्रीतम पाटील, समीर जाधव, सागर सांळुखे तसेच संबंधित कार्यकारी अभियंता व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील उपवन तलाव, कोलशेत महाविसर्जन घाट, पारसिक रेतीबंदर, मुंब्रा, मासुंदा तलाव, कोपरी व रायलादेवी तलाव आदी ठिकाणच्या विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गावर पडलेले खड्डे तसेच शहरात इतर ठिकाणी रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीने बुजविणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी बांधकाम विभागास दिले.
तसेच विसर्जन घाटावर आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देणे, विद्युत व्यवस्था, गणेशमूर्ती विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलशाची व्यवस्था करणे, गणेशमूर्ती विसर्जन फिरते स्विकृती केंद्रासाठी, निर्माल्य वाहतुकीसाठी लागणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यानी संबंधितांना दिले.
श्री गणेश मूर्तीचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेने एकूण ७ मोठे विसर्जन घाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोटया गणेश मूर्तीबरोबर मोठया आकाराच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्री मुर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी महापालिका श्री गणेश मुर्ती स्वीकार केंद्रे उभारणार आहे. तसेच प्रभाग समितीतंर्गत फिरती विसर्जन व्यवस्था असणार आहे.
गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्यावतीने ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा यावर्षी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोनाची खबरदारी म्हणून महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून बुस्टर डोस देण्याचीही व्यवस्था तिथे करण्यात येणार आहे.
…