पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाखांची मदत करावी – अजित पवार,
मुंबई दि २ ऑगस्ट (प्रतिनिधी) :- जुलै महिन्यात झालेल्या विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते व विधीमंडळ सदस्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज (२ ऑगस्ट रोजी) राजभवन येथे भेट घेऊन निवेदन दिले.
प्रसंगी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अदितीताई तटकरे, आमदार सर्वश्री अनिल पाटील, नितीन पवार, चंद्रकांत नवघरे, सुनील भुसारा आदी नेते शिष्टमंडळात सहभागी झाले होते. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी 75 हजार तर फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली.