⭕️ठाणे महापालिकेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंगा विक्री केंद्र सुरू
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तिरंगा खरेदी करुन केली उत्सवाची सुरूवात
ठाणे (ता 5 ऑगस्ट, संतोष पडवळ ) : भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी ‘घरोघरी तिरंगा’ उत्सव साजरा करण्यात येत आहे. नागरिकांना तिरंगा सहज उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तिरंगा विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पहिला ध्वज खरेदी करुन या उत्सवाची सुरूवात केली. यावेळी उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त संतोष देहेरकर, ठाणे महापालिकेचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.
दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. भारतीय ध्वजसंहितनुसार ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रितीने लावावा. फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावू नये, ध्वज कोणत्याही इतर ध्वजासोबत किंवा एकाच वेळी एकाच काठीवर इतर ध्वजासोबत फडकवू नये. ध्वज मोकळ्या जागेत किंवा घरावर लावायचा असल्यास तो दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत दिवस रात्र फडकविता येईल. तसेच या कालावधीत राष्ट्रध्वज काळजीपूर्वक जतन करावा. तरी नागरिकांनी ध्वज खरेदी करुन ‘घरोघरी तिरंगा’ हा उत्सव साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी केले. तसेच ठाणे महापालिका मुख्यालय व महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
घरोघरी तिरंगा या उपक्रमातंर्गत आपण खरेदी केलेला राष्ट्रध्वज दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या काळात फडकविल्यावर 7039680034 या व्हॉटसॲप क्रमांकावर किंवा tiranga@thanecity.gov.in या ईमेलवर छायाचित्र पाठवावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
—