सरस्वतीच्या प्रांगणात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
मुंबई, ता 15 ऑगस्ट (किशोर गावडे) श्री सरस्वती विद्या मंदिर या भांडुप पश्चिम मधील शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला गेला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची आखणी केली गेली.या कार्यक्रमाला शाळेचे संचालक माननीय श्री.वसंत सावंत साहेब , संचालिका सौ. वर्षा सावंत मॅडम , तसेच सिंधुदुर्ग एज्युकेशनच्या सोसायटीच्या पूर्वप्राथमिक , प्राथमिक ,माध्यमिक , टेक्निकल ,किंग्सटन इंग्रजी माध्यम, डी.एड. व नर्सिंग या सर्व विभागातील मुख्याध्यापक,विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व पालक उपस्थित होते.तीनही दिवस शाळे मध्ये देशभक्तीपर गीते , वर्ग सजावट स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , समूहगीत स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले . सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले . विद्यार्थी देशप्रेमाने अगदी भारावून गेले . आज 15 ऑगस्ट , 2022 या दिवशी शाळेतील ध्वजारोहण शालांत माध्यमिक परीक्षेत इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेल्या कुमारी कल्याणी घेवडे हिच्या हस्ते करण्यात आले . या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेच्या परिसरात प्रभात फेरी सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये आयोजित करण्यात आली . या प्रभातफेरी मध्ये विद्यार्थी , सर्व विभागाचे मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला . सर्व विद्यार्थी शालेय गणवेश तसेच पारंपारिक पोशाखात सुरेख घोषवाक्ये लिहिलेले फलक घेऊन सहाभागी झाले . वर्ग सजावट स्पर्धेमध्ये तर प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी स्वतः स्वातंत्र्यसैनिक बनला . त्या स्वातंत्रवीराच्या उल्लेखनीय कार्याने सुरेख वर्ग सजावट केली. यामुळे शाळेतील वातावरण देशभक्तीने भारावलेले आणि चैतन्यमय झाले. विद्यार्थ्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूरवीरांना ही दिलेली आदरांजलीच होय . शाळेची केलेली सुंदर सजावट विलोभनीय दिसत होती. सर्व विद्यार्थी वर्गात तयार झालेली देशप्रेमाची भावना हे या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे गोड फलित होय.