एसटीचे विलिनीकरण करा अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागा – काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस
मुंबई, दि. २२ ऑगस्ट (मिलन शाह) : एसटीचे विलिनीकरण राज्य शासनात व्हावे यासाठी आझाद मैदानात मोठे आंदोलन करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने पगारवाढीसह एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या तरिही विलिनीकरण हाच एकमेव पर्याय आहे यावर आंदोलनाचे नेतृत्व करणारे आ. गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत ठाम होते. आता भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे. आता एसटीचे विलीनीकरण कधी करणार? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी आ. पडळकर व सदाभाऊ खोत यांना विचारला आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यातील बहुतांश मान्यही केल्या होत्या तर विलिनीकरणाचा प्रश्न न्यायालयात होता. न्यायालयाचा निर्णय सरकारवर बंधनकारक आहे असेच राज्य सरकारही स्पष्ट करत होते परंतु आ. पडळकर व सदाभाऊ खोत हे एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत होते. आंदोलनादरम्यान या एसटी कर्मचाऱ्यांचे हालही झाले पण त्याची जबाबदारी या आमदारांनी घेतली नाही. चर्चेतून मार्ग काढला जात असताना हे भाजपा आमदार एसटी कर्मचाऱ्यांना चुकीची माहिती देत होते. विलिनीकरण हाच एकमेव पर्याय आहे हे ठासून सांगत होते. शेवटी ५४ दिवसांनंतर हा संप मिटला पण विलिनीकरणाचा प्रश्न सुटला नाही.
आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना विलिनीकरण हाच एकमेव पर्याय सांगितला होता. आता भाजपाचे सरकार राज्यात आलेले आहे. एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण कधी करणार हे आ. पडळकर व सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट करावे व त्यासाठी त्यांचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसटी विलिनीकरणाचा प्रश्न घेऊन विलिनीकरण करून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून केवळ आपले नेतृत्व चमकवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर केला याबद्दल जाहीर माफी मागावी, असेही राजहंस म्हणाले.