अधिवेशनातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डाव टाकला, भांडुपचे’ माजी आमदार अशोक पाटील शिंदे गटात सामील !
मुंबई, ता 22 (किशोर गावडे) : भांडुप मध्ये सर्वात मोठा धक्का, आणखी एक माजी आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत बंडाच्या वादळात भक्कमपणे शिवसेनेचा भगवा हातात घेणारे अशोक पाटील आज शिंदे गटात सामील होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.काल रात्रीपासून शिवसेनेच्या माजी आमदारांपैकी एकजण शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती.अशोक पाटील हे मातोश्रीच्या जवळचे आहेत. याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.माजी आमदार अशोक पाटील हे शिवसेनेच्या अंतर्गत कलहामुळे शिंदे गटात सामील होणार असल्याचे वृत्त हाती आले होते.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला विलंब होत असल्यामुळे शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता वाढत असतानाच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.
भांडुप मधील आणखी एक माजी आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी कालपासून जोर धरला होता. याविषयीची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिंदे गटात जाऊ शकणारा हा शिवसेनेचा आमदार दुसरा-तिसरा कोणी नसून अशोक पाटील हे आहेत.
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. याच अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुप्तपणे अशोक पाटील यांना गळाला लावल्याची चर्चा आहे. अधिवेशन सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक पाटील यांची भेट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अशोक पाटील आता शिंदे गटात प्रवेश करतील, या चर्चेने जोर धरला आहे. अशोक पाटील हे शिंदे गटात गेल्यास भांडुप मध्ये शिवसेना आणखी खिळखिळी होईल, यामध्ये शंकाच नाही. असेही जेष्ठ शिवसैनिकांनी खाजगीत बोलताना सांगितले.