कांदा प्रश्नांसाठी उत्पादक संतप्त ओतूर येथील शेतकऱ्यांचा रास्ता रोको
पुणे,जुन्नर ता 25 (संतोष पडवळ) : जुन्नर तालुका शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आज ओतूर येथे कांद्याच्या विविध प्रश्नांसाठी केलेल्या आंदोलनाला कांदा उत्पादक शेतकर्यांकडून उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.यावेळी या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, जेष्ठ शेतकरी नेते तानाजीशेठ बेनके, जिल्हा परिषद सदस्य मोहीत ढमाले, जुन्नरचे माजी सभापती विशाल तांबे,जुन्नर बाजार समितीचे माजी उपसभापती दिलीप डुंबरे, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंबादास हांडे, लक्ष्मण शिंदे, संजय भुजबळ, प्रमोद खांडगे, अजित वालझडे, अजित वाघ, डाॅ.दत्ता खोमणे, बबनराव जाधव, राजूशेठ बनकर, तसेच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पानसरे.जुन्नर अध्यक्ष ईश्वर गायकर. तसेच संपूर्ण तालुक्यातून कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमोद पानसरे यांनी सांगितले की, पूर्वी भारतीय कांद्याची निर्यात 40 टक्के होती. परंतु केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांमुळे कांदा निर्यात 8 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. लक्ष्मण शिंदे यांनी केंद्र सरकार सह राज्य शासनावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. डाॅ.खोमणे यांनी शासनाच्या शेतकर्यां विषयी चुकीच्या धोरणांचा फटका कांदा उत्पादक व इतरही शेतकर्यांना बसत असून कांद्याला कमितकमी 30 हमी भाव द्यावा अशी मागणी केली. उपसभापती दिलीप डुंबरे यांनी सांगितले ग्रामीण अर्थ व्यवस्था प्रामुख्याने शेती व्यवसायावरच अवलंबून असल्याने शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने खंत व्यक्त केली. तानाजी तांबे यांनी शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करून भविष्यात याही पेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.
माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी केंद्राचा शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करून सांगितले की, कांदा चाळीत सडलेल्या कांद्याचा शासनाने पंचनामा करावा आणि कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते तानाजीशेठ बेनके यांनी तीव्र शब्दांत संतप्त भावना व्यक्त केल्या.
यावेळी अजित वालझडे, अजित वाघ,प्रमोद खांडगे यांनी केंद्र सरकारसह राज्य शासनावर जोरदार प्रहार करून तीव्र शब्दांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच शासनाने तोट्यात विक्री झालेल्या कांद्याला प्रति किलो सरासरी 30 रूपये अनुदान जाहीर करावे अशी मागणी केली. रास्ता रोको मध्ये शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा समन्वयक आंबादास हांडे यांनी दोन्ही सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला सडक्या कांद्याचा हार घातला. तसेच शेतकर्यांना भीक नको पण त्यांच्या हक्काचे मिळालेच पाहिजे असे आवाहन केले. यावेळी अनेक कांदा उत्पादक शेतकर्यांनी केंद्र व राज्य सरकार विरूध्द संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सदर आंदोलनात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. प्रशासनाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाची दखल घ्यावी म्हणून जुन्नरचे नायब तहसीलदार किरवे यांनी निवेदन स्विकारले. सदर कांदा आंदोलनाकडे जुन्नर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.