फिरत्या आरोग्य केंद्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे ता २६, (संतोष पडवळ): ठाणे महापालिका क्षेत्रात असणाऱ्या आदिवासी पाड्यांतील नागरिकांनी आरोग्याच्या प्राथमिक तसेच आवश्यक अत्याधुनिक सेवा सुविधा त्यांच्या राहत्या घराजवळच मिळविण्यात यासाठी ठामपा सार्वजनिक आरोग्य विभाग व आयसीआयसीआय फाउंडेशन यांच्या सहकार्याने नव्याने तयार करण्यात आलेल्या ” फिरत्या आरोग्य केंद्राचे ” लोकार्पण आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर इतर सन्मानीय माजी नगरसेवक, नगरसेविका, उप आयुक्त मनीष जोशी आदी उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सर्व प्रभाग समिती मध्ये आरोग्य केंद्र तसेच महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. परंतु शहरातील काही आदिवासी पाड्यातील नागरिकांना आरोग्य केंद्रात येऊन उपचार घेणे शक्य नसते. याकरिता त्यांना त्यांच्या राहत्या घराजवळच प्राथमिक तसेच आवश्यक अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करावी यावं उद्देशाने ठाणे महापालिकेच्यावतीने आयसीआयसीआय फाउंडेशन यांच्या सहकार्याने नव्याने मोफत ” फिरत्या आरोग्य केंद्र ” तयार करण्यात आले. या आरोग्य केंद्राचे लोकार्पण आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या फिरत्या आरोग्य केंद्रात प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी आदींचा समावेश आहे. आदिवासी पाड्यातील नागरिकांना प्राथमिक तसेच अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्राथमिक तपासणी, औषधोपचार, लसीकरण, तसेच गरोदर महिलांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. अत्याधुनिक मशीनद्वारे सुसज्ज असे हे फिरते आरोग्य केंद्र आहे. गरोदर महिलांना ये-जा करण्यासाठी देखील याचा वापर करण्यात येणार आहे. तसेच या फिरत्या आरोग्य केंद्राला संपर्क करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापक कक्षाचा टोल फ्री संपर्क क्रमांकाच्या आधारे संपर्क क्रमांक जोडण्यात येणार आहे.