दिवा प्रभाग समिती कार्यालयावर दिवा मनसेचे ठिय्या आंदोलन
ठाणे, ता 29 (संतोष पडवळ) दिवा -आगासन रस्त्यावरील खड्यांमुळे झालेल्या दुर्देवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना १० लाखांची नुकसान भरपाई देण्याबाबत आणि या अपघाताला कारणीभूत असलेले महानगर पालिकेचे संबंधित अधिकारी अनिल पाटील यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधनाचा गुन्हा दाखल करण्याबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दिवा शहर अध्यक्ष श्री.तुषार भास्कर पाटील यांच्या नैतृत्वाखाली दिवा प्रभाग समिती, सहाय्यक आयुक्क्त त्याच्या दालनाबाहेर *ठिय्या आंदोलन* करण्यात आले.
काल रात्री ८ च्या सुमारास दिवा आगासन रस्त्यावर असलेल्या खड्यांमुळे तोल जाऊन दुचाकीस्वार तरुणाचा टँकर खाली येऊन जागीच मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वी स्थानिक आमदार राजु पाटील यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात घेतलेल्या बैठकीत हा मुद्दा मांडला होता. महापालिका आयुक्तांनी संबंधित रस्त्याचे अधिकारी श्री.अनिल पाटील यांना रस्त्याची पाहणी करून तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिलेले होते.दिवा मनसे कडून वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही अनिल पाटील यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही, अनिल पाटील यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि कामचुकारपणामुळे हा अपघात घडला असून याला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत असा आरोप मनसेने केला आहे.
त्यामुळे अनिल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधनाचा गुन्हा दाखल करावा तसेच या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना १० लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी *दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील* यांनी केली आहे.
यावेळी दिवा शहर मनसेचे सर्व पदाधिकारी, महिला सेना आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.