ईशान्य मुंबई महिला विभाग संघटकपदी राजश्री राजन मांदविलकर यांची निवड
माजी आमदार अशोक पाटील यांच्यावर शिंदे गटाने टाकली विभागप्रमुखपदाची जबाबदारी
मुंबई, ता ३०, ( किशोर गावडे) : भांडुप विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक पाटील यांनी पक्षात होत असलेल्या कथित अपमानास्पद वागणुकीमुळे शिंदे गटात केलेल्या पक्षप्रवेशामुळे भांडुपमधील शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला असताना, आता शिंदे गटाने अशोक पाटील यांना ईशान्य मुंबई विभागाच्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक पाटील यांना ही नवीन जबाबदारी देत त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
माजी आमदार अशोक पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या अनेक समर्थकांसमवेत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता. पक्षात तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत, स्थानिक पातळीवर कथित अपमानास्पद वागणुकीमुळे होत असलेली नाकेबंदी त्याचबरोबर अशातच पक्षश्रेष्टी भेट देत नसल्यामुळे माजी आमदार अशोक यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.
शिंदे गटात प्रवेश केल्याबरोबरच अशोक पाटील यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईशान्य मुंबई च्या विभागप्रमुखपदाची माळ गळ्यात टाकली आहे. ईशान्य मुंबई महिला विभाग संघटकपदी राजश्री राजन मांदविलकर यांची निवड करण्यात आली आहे.
विभागप्रमुख पदाची जबाबदारी घेताच अशोक पाटील हे सर्व नाराज शाखाप्रमुख, माजी शाखाप्रमुख व पदाधिकारी यांच्या संपर्कात येत असून, या नाराजांना गळाला लावून त्यांना शिंदे गटात सामील करून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते.
त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विजनवासात गेलेल्या अशोक पाटील यांना शिंदे गटाने विभागप्रमुखपदाची जबाबदारी देत विद्यमान आमदारासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
त्यामुळे येत्या काळात ही लढाई अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे कळते.