राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन
ठाणे (ता 13, संतोष पडवळ ) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत ठाणे महानगरपालिकेच्यावतीने रविवार दिनांक 18 सप्टेंबर, २०२2 रोजी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत नागरिकांनी ५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओचे समुळ उच्चाटन करण्याचे ध्येय निर्धारीत केले असून, त्या पार्श्वभूमीवर भारतात सातत्याने पल्स पोलिओ विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येते. गेल्या 16 वर्षांपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ठाणे महापालिकेने उत्कृष्टपणे राबविली आहे. या मोहिमेस सर्व स्तरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
रविवार दिनांक 18 सप्टेंबर, २०२2 रोजी ठाणे महापालिकेच्यावतीने विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून, या मोहिमेतंर्गत ५ वर्षापर्यंतचे एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. सदर दिवशी महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी बुथवर पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांनी बाळाच्या पहिल्या वाढदिवसापर्यत बी.सी.जी., ट्रिपल पोलिओ, गोवर, काविळ, पेंटाव्हॅलेट पंचगुणी या लसी व अ जीवन सत्राची मात्रा देवून आपल्या बाळास संरक्षीत करावे. तसेच रविवारी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.