महापालिकेचा कनिष्ठ अभियंता 30 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात जाळ्यात
पुणे, ता 14 (ब्युरो रिपोर्ट) : केलेल्या कामाचे प्रलंबित असलेले बिल मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारल्यानंतर पुणे महापालिकेच्या एका कनिष्ठ अभियंत्याला पकडण्यात आले. लाचलुचपत विभागाने सायंकाळी ही कारवाई केली.व्यंकटेश लक्ष्मण पाटील(वय ४०) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की,तक्रारदार व्यक्तीने स्वारगेट पाणीपुरवठा विभागातील धायरी परिसरात पाण्याविषयी काही कामे केले होते.याचे चार लाख रुपयांचे बिल प्रलंबित होते.हे बिल मंजूर करून देण्यासाठी पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता असलेल्या व्यंकटेश पाटील यांनी तीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
दरम्यान तक्रारदार यांनी याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती.त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या माहितीची पडताळणी करून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना व्यंकटेश पाटील याला रंगेहात पकडले.याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.