ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी पुण्यात निधन
पुणे, ता 14 (संतोष पडवळ) : मूळच्या संगमनेरच्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या मोजक्या गाण्यांपैकी एक ‘राजसा जवळी जरा बसा’ हे गाणे गुलाबबाई संगमनेर यांनी सादर करावी, अशी इच्छा खुद्द लतादीदींनी व्यक्त केली होती. लतादीदींच्या बोलण्याला अनुसरून गुलाबबाईंनीही या लावणीवर तितक्याच दर्जाचा अभिनय केला होता.प्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गुलाबबाई संगमनेरकर यांनी गायलेली अनेक गाणी त्या काळी आकाशवाणीच्या सागर सभेत प्रसारित झाली. त्यांना दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या ‘विठाबाई नारायणगावकर’ जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.‘गुलाबामावशी संगमनेरकर’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या गुलाबबाई संगमनेरकर या लावणी क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व, महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार विजेत्या आणि आयुष्यभर आपल्या मूळ संगमनेरचे नाव अभिमानाने ठेवणाऱ्या ज्येष्ठ कलाकार होत्या.