स्वच्छता अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेत चित्रकला स्पर्धा संपन्न ; अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग
ठाणे (ता १५, संतोष पडवळ ) : स्वच्छता अमृत महोत्सवाच्या निमित्ताने, गुरूवारी अभियंता दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकतर्फे मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमागची संकल्पना ठाणे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची होती. स्पर्धेत ठाणे महापालिकेचे अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
या स्पर्धकांच्या चित्रांची पाहणी व त्यांचे कौतुक करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा, माजी नगरसेवक राम रेपाळे, रमाकांत मढवी आणि योगेश जानकर आवर्जून उपस्थित होते. शहर अभियंता प्रकाश सोनाग्रा यांच्यासह सर्व स्पर्धकांनी ठाणे आणि स्वच्छता या संकल्पनेवर आधारित चित्रे रेखाटली. उपायुक्त अनघा कदम आणि मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी या उपक्रमाचे संयाेजन केले. दोन तास चाललेल्या या स्पर्धेने स्वच्छता अमृत महोत्सवाच्या उपक्रमांची प्रातिनिधिक सुरूवात करण्यात आली.
नोंदणी करण्याचे आवाहन
स्वच्छता अमृत महोत्सवात आपला सक्रिय सहभाग दर्शविण्यासाठी, प्रत्येक ठाणेकर नागरिकाने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पोर्टलवरील लिंकवर (https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/) आपली नोंदणी करून या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले.