ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाच्या ताब्यातील वास्तू रेडी-रेकनर दराने भाडेतत्वावर देणार

0

ठाणे (ता १९, संतोष पडवळ ) : ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाच्या ताब्यातील वास्तू विविध संस्थांना समाज उपयोगी कामांसाठी दिल्या जातात. या वास्तू आता स्वारस्य अभिव्यक्ती सूचना (EOI) काढून रेडी-रेकनर दराने भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार आजवर देण्यात नाममात्र भाडे दराने देण्यात आलेल्या वास्तू ताब्यात घेण्याची कारवाई कार्यालयीन अधीक्षक व अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे सहाय्यक आयुक्‌त महेश आहेर यांचे मार्फत करण्यात आली.

त्यानुसार, सिध्देश्वर तलाव परिसरातील निसर्ग संस्कार भवन ही तळ अधिक एक १ मजली वास्तू, स्थावर मालमत्ता विभागाच्या ताब्यात असलेली इमारत चैत्रगौरी महिला मंडळ यांना EOI प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक रुपया नाममात्र या दराने मा. महासभेच्या मान्यतेने तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आली होती. सदर वास्तू रेडी-रेकनर दराने भाडेतत्वावर देण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाने चैत्रगौरी महिला मंडळ यांच्याकडून ही वास्तू ताब्यात घेण्यात आली.

तसेच, कोलबाड येथील तळ अधिक एक मजली वास्तू नागेश्वर हेल्थ ॲण्ड स्पोटस् क्लब यांना भाडे कराराने देण्यात आली होती. भाडे कराराची मुदत संपल्यामुळे ही वास्तू देखील स्थावर मालमत्ता विभागाने ताब्यात घेतलेली आहे.

त्याशिवाय, सावरकरनगर येथील म्हाडा वसाहत येथील आमदार व खासदार निधीतून बांधण्यात आलेली व्यायाम शाळा ही सावरकरनगर रहिवाशी संघ यांना भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात आली होती. या कराराची मुदत संपली असून त्याचे भाडे रु. ८९,४४२/- इतके येणे बाकी होते. त्यापैकी दिनांक ०७.०९.२०२२ रोजी रु.१५०००/- व दि. १९.०९.२०२२ रोजी रु.५२,८२३/- एवढी रक्कम भरण्यात आली. तथापि आजमितीस रक्कम रु. २१,५१७/- एवढी भाडे रक्कम भरणे बाकी आहे. तसेच या वास्तूच्या उर्वरीत जागेत अनधिकृत बांधकाम केल्यामुळे स्थावर मालमत्ता विभाग व लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती यांनी संयुक्तपणे सदरची वास्तू ताब्यात घेतलेली आहे. या प्रकरणी राजू शिरोडकर यांचेवर एम.आर.टी.पी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार व खासदार निधीतून बांधण्यात आलेले समाज मंदिर व व्यायामशाळा या वास्तू भाडेतत्वावर विविध संस्थांना दिल्या असून त्यांची मुदत संपलेली आहे. यासाठी नव्याने भाडे करार करण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाकडून EOI काढण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिली.

अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई

वाघबीळ येथील अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महेंद्र चिंतामण पाटील (मया पाटील) यांचेवर एम.आर.टी.पी. अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नौपाडा प्रभाग समितीअंतर्गत वाणिज्य गाळयांच्या मागील मोकळया जागेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी प्रकाश पायरे यांचेवर एमआरटीपी कायद्यांतर्गत नौपाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील सर्व कारवाई स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधिक्षक व अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा सनियंत्रण व समन्वय अधिकारी महेश आहेर यांचेमार्फत मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!