दिव्यातील पश्चिम भागात अनेक वर्षे अत्यल्प पाणी पुरवठा तरीही लाखोंची बिलं रहिवाशांचा प्रभाग समितीवर एल्गार.

0

ठाणे, दिवा, ता 23 ( संतोष पडवळ): दिवा शहरातील पश्चिम भागात एन. आर. नगर, क्रिश कॉलनी, नागवाडी, बंदर आळी, बालदा नगर, गणेश चौक या भागात गेली अनेक वर्ष ठाणे महानगरपालिकेकडून अत्यल्प पाणीपुरवठा केला जातो. दिवा शहराच्या शेवटच्या टोकाला असल्यामुळे या विभागाला पाणी पोहोचत नाही असे सांगितले जाते. गेल्या अनेक वर्षात या विभागातून पाणीटंचाई दूर व्हावी किंवा या विभागातील नागरिकांना ठाणे महानगरपालिकेचे पाणी मिळावं, यासाठी अनेक निवेदनं व आंदोलने या विभागाच्या वतीने करण्यात आली होती. या विभागातील पाणीटंचाई विषयी अनेक प्रसार माध्यमांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये व वर्तमानपत्रात छापून देखील आलेले आहे. या विभागातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी लोकल ट्रेन पकडून मुंब्र्याला देखील पाणी आणण्यासाठी जात होते आणि अशा प्रकारे आपली तहान भागवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना रेल्वे अपघाताला देखील सामोरे जावे लागले आहे. या विभागातील काही नागरिकांचा पाणी आणण्यासाठी जात असताना लोकलची धडक लागून मृत्यू देखील झालेला आहे. असे सर्व असताना या विभागातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने कोणतेही ठोस प्रयत्न न केल्याने सध्या या विभागाला वर्षभरापासून जेमतेम पाणीपुरवठा केला जातोय परंतु, तोही दहा ते वीस लिटर इतकाच मिळतो. त्यामुळे ह्या परिसरातील नागरिकांना प्रामुख्याने बोरवेल च्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. असे असताना ठाणे महानगरपालिका प्रशासन मात्र या विभागाला लाखोंची पाण्याची बिले पाठवत आहे. बऱ्याच इमारतींना नियमित बिल न पाठवता अचानक ह्या इमारतींना लाखोंची बिल पाठवल्यामुळे रहिवाशी संतप्त झाले आहेत. ही लाखोंच्या घरातील पाणी बिलं भरणे हे इथल्या सामान्य रहिवाशांच्या आवाक्या बाहेर आहे. शिवाय पाणीपुरवठा केलेला नसतानाही बिल भरणे, बिलं पाठवणं आणि ती रहिवाशांना भरायला लावणं हे कुठेतरी नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे. या विभागातील पाणीटंचाई ही सर्वश्रुत असून पालिकेच्या बहुतांश अधिकाऱ्यांना ही सत्यता माहित देखील आहे. या विभागात असणाऱ्या इमारतींची पाणी बिलं रद्द करून या विभागाला अभय योजनेद्वारे नव्याने नळ जोडणी करून मिळावी व पाण्याचे मीटर देखील बसून द्यावेत, जेणेकरून येथील रहिवासी नियमित बिल भरणा करतील.
प्रसंगी आम्हाला पाठवण्यात आलेली लाखोंची बिल रद्द करून प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि आम्हा रहिवाशांना न्याय द्यावा याकरिता अँड.आदेश भगत यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी सहायक आयुक्तांना निवेदन देण्यात आले.प्रसंगी स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख नितीन ओतूरकर, शिवाजी सुतार, भरत मोर्या आदी पदाधिकारी आणि इमारतींमधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!