ठाणे ( ता 28, संतोष पडवळ ): सहायक, जन तसेच अपिलीय माहिती अधिकारी आणि जागरूक नागरिक यांच्यात समन्वय व संवादाची गरज असल्याचे प्रतिपादन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे सुभाष बसवेकर यांनी केले. ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपायुक्त बाळासाहेब चव्हाण होते.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या आदेशानुसार २८ सप्टेंबर रोजी ठाणे महानगरपालिका मुख्यालय आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने, ठाणे महानगरपालिकेतर्फे मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात माहिती अधिकाराविषयी जागृती करणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
संवाद नसला की गैरसमज होतो आणि त्यातून माहिती नाकारण्याचे किंवा विलंबाने देण्याचे प्रमाण वाढते, असे निरिक्षण सुभाष बसवेकर यांनी भाषणात नोंदवले. माहिती अधिकार कायद्यातील १ ते ३० कलमांबद्दल बसवेकर यांनी विवेचन केले. शासन व्यवहारात पारदर्शकता यायला पाहिजे, हाच या कायद्याचे मुख्य उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व विशद केले.
या प्रसंगी, माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या शहर शाखेचे अध्यक्ष दयानंद उल्मिक आणि ग्रामीण शाखेचे अध्यक्ष शंकर वडवले यांच्यासह महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
तसेच, आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने, विद्यार्थ्यांमध्ये माहिती अधिकार कायद्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चित्रकला, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!