महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी थेट १ नोव्हेंबरला !
नवी दिल्ली, ता 28 (ब्युरो रिपोर्ट) :- पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडून केला जाणार असला तरी आमदारांच्या अपात्रतेबाबत व सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत मात्र सुप्रीम कोर्टातच फैसला होणार आहे. या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सुनावणीची पुढील तारीख ही थेट १ नोव्हेंबर असणार आहे .
राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर मूळ शिवसेनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हक्क सांगितला आणि पक्षचिन्हाची लढाई निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. याप्रकणी मंगळवारी झालेल्या सुनावणीत ‘खरी शिवसेना कोणाची’, याचा निवाडा भारतीय निवडणूक आयोग करेल, असं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने म्हटलं आहे. पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडून केला जाणार असला तरी आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत मात्र सुप्रीम कोर्टातच फैसला होणार आहे. त्यामुळे घटनापीठाकडून पुढील सुनावणी कधी घेतली जाणार याबाबत राज्यात उत्सुकता निर्माण झालेली असतानाच पुढील सुनावणी थेट १ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर निर्णय घेण्यासाठी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या खंडपीठापुढे काल पहिली सुनावणी झाल्यानंतर आता पुढील सुनावणी १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुढील सुनावणीसाठी जवळपास महिनाभर वाट पाहावी लागणार असल्याचे समजते. मात्र त्याआधीच कोणी या प्रकरणाची अर्जंन्सी घटनापीठाच्या निदर्शनास आणून दिली तरंच याप्रकरणी आधी सुनावणी होऊ शकते .