ठाणे मनपाच्या ४० व्या वर्धापनदिनी सर्वसामान्यांची कामे आपण तन्मयतेने करतो यावर संस्थेचे यशापयश अवलंबून आयुक्त अभिजीत बांगर यांचे प्रतिपादन
ठाणे (ता ०७, संतोष पडवळ ) : ज्याच्यासाठी कोणीही सोबत येणार नाही, असा सर्वसामान्य माणूस मला भेटू शकतो का आणि त्याचे काम मी किती तन्मयतेने करतो, यावर संस्थेचे यशापयश अवलंबून आहे. आपल्या संस्थेत फक्त आयुक्तच नव्हे तर प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी या भावनेने काम करू लागला, तर ती आपली ओळख ठरेल, तशी ती ठरावी, अशी अपेक्षा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या ४०व्या वर्धापन दिन सोहळ्यात अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली.
ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाचा दुसरा टप्पा शुक्रवारी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात, पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विविध कार्यक्रम सादर केले. मध्यंतरानंतर, झालेल्या सोहळ्यात महापालिकेने आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेतील विजेत्यांना माजी उप महापौर पल्लवी कदम, माजी सभागृह नेते अशोक वैती, माजी नगरसेविका अनिता गौरी, मंगल कांबळे, आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
त्यानंतर, संवाद साधताना आयुक्त बांगर यांनी, अधिकारी व कर्मचारी यांचे कार्यक्रमाबद्दल कौतुक केले. त्याचवेळी, वर्धापन दिनाच्या निमित्ताने महापालिका म्हणून आपली कर्तव्य काय हे पुन्हा अधोरेखित केले.
महापालिकेचे काम सगळ्यात आव्हानात्मक असते. चांगले काम केले तर त्यावेळी कौतुक होईल, वाईट काम केले तर टीकाही ठरलेली आहे. आपली रोज परीक्षा असते, त्यामुळे आपण आत्मसंतुष्ट होता कामा नये, प्रत्येक दिवस नवीन मानून काम करायला हवे, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
कोविड काळात आपण मनापासून काम केले. त्यात काही त्रुटी असल्या तरी कार्यक्षमता दाखवून दिली. ती कार्यक्षमता आपल्या दैनंदिन कामातही, वर्तनाही दिसावी, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी जशी तन्मयता दाखवली ती वर्षभर कायम राखावी, अशी माझी रास्त अपेक्षा आहे, असे आयुक्त बांगर म्हणाले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेऊन कर्मचारी व अधिकारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी महापौर नरेश म्हस्के आणि मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, माजी नगरसेविका शिल्पा वाघ, ॲङ अनिता गौरी, मंगल कळंबे, विकास रेपाळे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी प्रास्ताविक केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर आणि प्रभारी उप माहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांनी केले. तर, संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय प्रभारी उपायुक्त मिनल पालांडे आणि मिलिंद माईणकर यांनी केले.
*कर्मचारी समस्या सोडविण्यास प्राधान्य*
पालिकेतील कर्मचारी विशेषत: वर्ग ३ व ४ चे कर्मचारी यांच्या समस्या प्रलंबित असतात. प्रशासन म्हणून माझ्या पूर्ण कार्यकाळात त्या समस्या प्राधान्याने सोडविण्यास मी बांधील आहे, असे आयुक्तांनी सांगताच, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
————————