ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान तर ऑक्टोबर महिन्याचा पगारही २० ऑक्टोबरपूर्वी
ठाणे(ता १३, संतोष पडवळ ) : ठाणे महापालिका आणि ठाणे परिवहन उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांना सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त रुपये १८ हजार इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केली. गेली दोन वर्षे १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते.
गुरुवारी सायंकाळी झालेल्या तातडीच्या दृक् श्राव्य पद्धतीने झालेल्या बैठकीत सानुग्रह अनुदानाबद्दल चर्चा झाली. मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या या बैठकीत, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे उपस्थित होते. मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने मध्यस्थी केली. मागील दोन वर्षे कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात वाढ केलेली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर, महापालिकेवर अतिरिक्त भार पडला तरी वाढ करायलाच हवी, असे म्हणत मा. मुख्यमंत्र्यांनी १८ हजार इतके सानुग्रह अनुदानावर शिक्कामोर्तब केले.
त्याचबरोबर, ऑक्टोबर अखेरीस असलेली दिवाळी लक्षात घेऊन चालू ऑक्टोबर महिन्याचा पगार २० ऑक्टोबरपूर्वी करावा. त्यात विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली. त्या पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
कंत्राटी कामगारांनाही नियमाप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे, ठाणे महापालिकेस सानुग्रह अनुदानापोटी सुमारे १४ कोटी इतका अतिरिक्त भार येणार आहे.