⭕️ठाण्यातील लफाट चाळीतील 30 सफाई कामगारांचे महापालिकेने केले स्थलांतर

ठाणे, ता. 13 (संतोष पडवळ) : खारटन रोड येथील महापालिकेच्या जागेत सफाई कामगारांना निवासी जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात सदरहू वास्तू धोकादायक झाल्यामुळे या 100 सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना इतरत्र तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आले होते. आज उर्वरित 30 सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना खारटन रोडवरील गोठा चाळ स्थलांतरीत करण्याची कार्यवाही सहाय्यक आयुक्त सनियंत्रक व समन्वयक महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अजय एडके यांनी केली.
महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतंर्गत येत असलेल्या आरोग्य खात्यातील सफाई कर्मचाऱ्यांना खारटन रोड येथील महापालिकेच्या जागेत जवळजवळ 191 कर्मचाऱ्यांना सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. परंतु सदरहू सदनिका जुन्या झाल्यामुळे सदर भूखंडावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्वावर पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण भूखंड मोकळा करणे गरजेचे होते. दरम्यानच्या काळात 100 सफाई कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच जागा रिकामी केली आहे. तर आज उर्वरित 30 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना गोठा चाळ येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
लफाट चाळीतून स्थलांतरीत करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना येत्या काळामध्ये सुसज्ज अशी मालकी हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत सदर कर्मचाऱ्यांचे महापालिकेने स्थलांतर केले असले तरी त्यांचे मासिक वेतनातील घरभाडे लागू करण्यात येणार आहे. आज महापालिकेने कार्यवाही केली असली तरी अजून 61 कुटुंबिय त्याच ठिकाणी राहत असल्यामुळे विकासकामात अडचणी निर्माण होणार असल्याने या कुटुंबियांने देखील लवकरात लवकर जागा खाली करुन विकासकामाला सहकार्य करावे असेही आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
तसेच सेवानिवृत्त कामगारांची उपदानाची रक्कम त्यांना नियमानुसार देण्यात येणार असल्याची अशी माहिती सहाय्यक आयुक्त सनियंत्रक व समन्वयक महेश आहेर यांनी दिली आहे.
..