⭕️कहां तुम चले गए…डोंबिवलीत अनोखी सांगीतिक श्रद्धांजली
डोंबिवली, ता 18 (संतोष पडवळ):- आयुष्य हे पाण्याच्या बुडबुड्या सारखं असतं असं म्हणतात ते काही खोटं नाही. डोंबिवली येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिपक जाधव यांची भाची कु. लिपिका सुनिल बनसोडे वय वर्ष बावीस. डोंबिवली येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयात एम. ए. द्वितीय वर्षाला शिकणारी अत्यंत हुशार व मनमिळावू विद्यार्थीनी सहा महिन्यांपूर्वी अचानक या जगाचा निरोप घेऊन निघून गेली. व्यक्ती निघून जाते पण आठवणी मात्र सतत सोबत चालतात. लिपिका इंग्रजी मराठी आणि हिंदी भाषेत सुत्रसंचालन उत्कृष्ट वक्तुत्व तथा गाणी गाऊन स्टेज गाजवणारी हरहुन्नरी कलाकार. म्हणूनच तिच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी साप्ताहिक शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव आणि सुप्रसिद्ध गायिका तथा आर्यन धून आॕर्केस्ट्राच्या सर्वेसर्वा सौ. रेखा निकुंभ यांनी लिपिकाच्या जीवन प्रवासावर ‘ कहां तुम चले गए ‘ नावाने रविवार १६ आॕक्टोबर २०२२ रोजी डोंबिवली पश्चिमेच्या ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात सांगीतिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरातील लहान थोर अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला लिपिकाच्या जीवनातील विविध प्रसंगांवर तथा तिने गायलेली गाणी. वेगवेगळ्या विषयांवर तिने मांडलेली मतं आणि तिच्या काॕलेजचे प्राचार्य प्रा. डाॕ. राजेंद्र करनकाळ सर. प्रा. डाॕ. सुनिल पवार सर. तथा तिची मैत्रीण मोनिका पाटील. तिच्यावर जिवापाड प्रेम करणारी मंडळी तन्वी कारेकर, रेखा निकुंभ, शिवाजी जाधव. मकरंद खाडे. चंद्रभागा खाडे. प्रा. दिपक जाधव. हर्ष डगळे, जय डगळे यांच्या मुलाखती स्क्रिनवर दाखविण्यात आल्या. नंतर रेखा निकुंभ यांनी ‘ ना चिठ्ठी ना संदेस न जाने कौनसा है वो देस जहां तुम चले गाए ‘ हे गाणं गाऊन रसिक प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला. लिपिका स्वतः उत्कृष्ट गायिका असल्याने या कार्यक्रमात निवडलेली सर्वच नवी जुनी गाणी तिच्याच आवडीची घेतली होती. उत्तरोत्तर कार्यक्रम खूप रंगला. रेखा जी आणि प्रा. दिपक जाधव यांनी ‘ एक प्यार का नगमा हे.’ गाणं तथा इतर बरीच मराठी हिंदी युगुरगीतं गाऊन रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. या प्रसंगी संजय मामा खडपे, विनय डांगे, सदाशिव रेवणकर, उज्वला पानमंद यांनी ही बरीच गाणी सादर केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिपिकाचे पप्पा श्री. सुनिल बनसोडे, मम्मी सौ. साईली बनसोडे, लता जाधव, बाबुराव जाधव, नागेश जाधव, किरण देवळेकर, गौरी देवळेकर, भारती जाधव, संजय डगळे, सीमा जाधव, गिरीश बरामकुळे, अशोक म्हस्के, दिव्येश ठक्कर, राजू रेवणकर आदी अनेकांनी बहुमोल सहकार्य केलं. कार्यक्रमाच्या शेवटी रेखा निकुंभ यांनी सादर केलेल्या ‘ रहे ना रहे हम महका करेंगे..’ या गाण्याने उपस्थितांना अक्षरशः हेलावून टाकले..