डेंग्यूचा प्रत्येक संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झालाच पाहिजे – अभिजीत बांगर, आयुक्त ठाणे मनपा
ठाणे ( ता १९, संतोष पडवळ ) : डेंग्यूचा प्रत्येक संशयितरुग्ण रूग्णालयात दाखल झालाच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी वॉर्डकायम उपलब्ध पाहिजे. सध्या तीन सक्रिय रुग्ण असेल तरी गाफील राहता येणार नाही.आठवडाभरातील संशयित रुग्णांचा, कोविड काळात करत होतो तसाच दैनंदिन पाठपुरावा ठेवावा, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिले.
त्याचबरोबर, रुग्णांचे मॅपिंग करावे म्हणजे कोणत्या भागात प्रार्दूभाव आहे हेही कळू शकेल. त्यानुसार डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करण्यास मदत मिळेल. नियमित औषध फवारणी करावी, तसेच घरोघरी जावून तपासणी करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आली आहे. रुग्णाला पेटलेट्स,रक्त चाचण्या करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर पाठवायचे नाही. त्याचा खर्च रुग्णांवरटाकायचा नाही, अशा स्पष्ट सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या.
सध्यस्थितीत डेंग्यू व मलेरिया या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये सप्टेंबर महिन्यात डेंग्युचे संशयित आणि निश्चित निदान केलेले ५ रुग्ण आणि मलेरियाचे ८८ रुग्ण आढळून आले होते. तर डेंग्युचा व मलेरियाचा प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे. तसेच, ऑक्टोबर महिन्यामध्ये डेंग्यूचे निश्चित निदान केलेले ५ रुग्ण आणि मलेरियाचे ५९ रुग्ण आढळून आले होते.
ऑक्टोबर महिन्यात सन २०१९ मध्ये निदान झालेले डेंग्यूचे ३२३ तर मलेरियाचे 636 रुग्ण आढळून आले होते. सन 2020 मध्ये डेंग्यूचे 79 तर मलेरियाचे २९९ रुग्ण आढळले होते. सन २०२१ मध्ये डेंग्यूचे २० तर मलेरियाचे ४८७रुग्ण आढळून आले होते. ठाणे शहरात डेंग्यू व मलेरिया आजाराचे रुग्ण वाढू नये यासाठी संशयित रुग्णांची योग्य तपासणी तसेच नियमित औषध फवारणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रामध्ये औषध फवारणी आणि १८३३९ ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील एकूण ४८७२० घरांची तपासणी केली असून त्यापैकी २९४ 4 घरे दूषित आढळली आहेत. तसेच एकूण ६१८९४ कंटेनरची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५६६ कंटेनर दूषित आढळले आहेत. त्यापैकी ३०३ कंटेनर रिकामे करण्यात आले असून सर्व दूषित कंटेनरमध्ये महापालिकेच्यावतीने किटकनाशक औषध फवारणी करण्यात आली आहे.
……………………………….