जिल्हा वार्षिक योजनांचे प्रस्ताव तातडीने पाठवण्याचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.
ठाणे, ता 3 नोव्हे (संतोष पडवळ) : ठाणे जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणाऱ्या २०२२-२३ या वर्षातील जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण विशेष घटक योजनेतील कामे ही वेळेत पूर्ण होऊन शंभर टक्के निधी खर्च होण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित कार्यान्वयन यंत्रणांनी वेळेत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव तातडीने पाठवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बुधवारी दिले. दरम्यान यापुढे जे अधिकारी जिल्हास्तरीय सभेत गैरहजर असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले.
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्ह्यातील यंत्रणांची बैठक झाली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक
आयुक्त समाधान इंगळे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन निधीतून आतापर्यंत झालेल्या खर्चाचा तसेच कामांचा यंत्रणानिहाय आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. २०२२-२३ या वर्षांसाठी यंत्रणांना देण्यात आलेल्या निधीनुसार कामांसाठीचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव अद्याप बऱ्याच प्रमाणात अप्राप्त आहेत. हे प्रस्ताव शुक्रवारपर्यंत जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्याचे निर्देश शिनगारे यांनी यावेळी दिले.
पुढे बोलताना शिनगारे म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत योजना पोचविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनांचा निधी दिला जातो. हा निधी वेळेत त्यांच्यापर्यंत पोचविणे ही यंत्रणांची जबाबदारी आहे. आतापर्यंत अनेक विभागांचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव आलेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.