ठाण्यातही चित्रनगरी उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
ठाणे, ता 6 नोव्हे (संतोष पडवळ) : अनेक मराठी मालिकांचे, चित्रपटांचे चित्रिकरण ठाण्यात केलं जातंय. त्यामुळे मुंबईतील चित्रनगरी आता हळूहळू ठाण्याकडे वळतेय. असं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात ठाण्यातही चित्रनगरी उभारू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. ज्येष्ठ नाट्यअभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाचे १२५०० प्रयोग झाल्याच्या निमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात त्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
रसिक प्रेक्षकांनी दाद दिली तरच कलाकाराच मनोबल वाढते. आमचंही तसंच आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. उशिरापर्यंत ते काम करायचे. गर्दी जमायची. कामं तत्काळ केली जायची. करतो, बघतो, ठेवतो असे शब्द आमच्या शब्दकोशात नाहीत. काम होणार असेल तर आम्ही करतो. नसेल तर नाही सांगतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबईतील गोरेगाव येथे मोठी चित्रनगरी आहे. मराठी, हिंदी मालिकांसह बॉलिवड चित्रपटांचंही येथे चित्रिकरण होतं. त्यानंतर, प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी रायगड येथे भव्य चित्रनगरी उभारली आहे. या चित्रनगरीलाही भव्य प्रतिसाद मिळाला. त्यानंतर, आता ठाण्यातही चित्रनगरी उभी राहणार आहे.