ठाणे मनपाकडून पाणीपट्टी वसुली संदर्भात व्यापक मोहिम ; ५१ कोटी २१ लाखांची वसुली.
ठाणे (ता,9 नोव्हे, संतोष पडवळ ) : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात पाणीपट्टी वसुली मोहिम व्यापक प्रमाणात सुरू असून १ एप्रिल २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत एकूण ५१ कोटी २१ लाख ८८ हजार इतकी वसुली झाली आहे. गतवर्षीपेक्षा या काळातील वुसलीच्या तुलनेत ही वसुली सुमारे ३४ टक्के अधिक आहे.
नागरिकांनी पाणीपट्टी वसुलीस दिलेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी वसुली मोहीम अशाच पद्धतीने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रभागसमितीनिहाय आढावा घेण्यात येत आहे. या अनुषंगाने १७ ऑक्टोबर रोजी अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पाणीपट्टी वसुली, थकबाकी याबाबत प्रकर्षाने चर्चा करुन आवश्यक उपाययोजना राबविणे व आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आल्या होत्या.
जे मालमत्ता धारक आपली पाणीपट्टी भरण्यास दिरंगाई करीत आहे अशांवर दिनांक १८ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर या काळात थकबाकी वसुलीची कारवाई करण्यात आली. त्यात, १०४८ मालमत्तांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तर १२८ जणांचे मोटरपंप जप्त करुन ६३० जणांना नोटीस बजावण्यात आली. या कारवाईमध्ये २९ पंपरुम सील करण्यात आले. १५ दिवसांच्या कालावधीत दोन कोटी 95 लाख इतकी थकबाकी वसुल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता आणि समन्वय अधिकारी (पाणीपुरवठा विभाग) विनोद पवार यांनी दिली.
सदरची वसुली मोहिम ही यापुढेही तीव्र स्वरुपात सुरू राहणार असून नागरिकांनी आपला पाणीपट्टी कर नियमित भरुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांनी केले आहे.
*मागील सात महिन्यांच्या कालावधीत झालेली प्रभागनिहाय वसुली*
*दिवा* – 4,32,73,085
*कळवा* – 4,51,74,244
*लोकमान्य-सावरकर नगर* – 3,77,71,347
*माजिवडा-मानपाडा* – 8,77,94,211
*मुंब्रा* – 4,57,48,979
*नौपाडा-कोपरी* – 5,99,67,425
*उथळसर* – 4,59,88,561
*वर्तकनगर* – 4,99,19,488
*वागळे* – 2,77,29,431
*नागरी सुविधा केंद्र* – 6,88,21,295
*एकूण* – 51,21,88,066 कोटी.